राज्यस्तरीय पुरस्कारासाठी शरद पवळे यांची निवड — सामाजिक चळवळींची उज्ज्वल दखल
शिरूर:सुदर्शन दरेकर ( कार्यकारी संपादक)
सामाजिक बांधिलकीच्या कार्यातून ग्रामीण महाराष्ट्रात मोठी चळवळ उभारणारे अहिल्यानगर (ता. पारनेर) येथील शरद भाऊसाहेब पवळे यांची राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड झाली आहे. येत्या ३० जुलै रोजी पंढरपूर येथे आयोजित विशेष समारंभात त्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.
शरद पवळे यांचे कार्य केवळ एका गावापुरते मर्यादित न राहता राज्यभर पोहोचले आहे.
त्यांनी गेल्या अनेक वर्षांत व्यसनमुक्ती, जलसंवर्धन, वृक्षारोपण, बालसंस्कार, सामाजिक न्याय, बेरोजगारी, कमांडमुक्त गाव, आणि ग्रामविकास यांसारख्या विविध विषयांवर लोकजागृती करत चळवळी उभ्या केल्या आहेत.
त्यांच्या नेतृत्वाखाली "शिव पाणंद शेतरस्ता चळवळ" राज्यभर पोहचली असून, या अभियानामुळे शेकडो प्रलंबित शेतरस्ते खुले होण्यास मदत झाली. मुंबई उच्च न्यायालयात रिट दाखल करून राज्य शासनाचे लक्ष वेधून मोफत पोलिस संरक्षण, मोजणी, रस्ते नोंदणीसाठी शासन निर्णय मिळवण्यात त्यांनी यश मिळवले आहे.
सामाजिक आंदोलन, उपोषण, रास्ता रोको, आणि जनजागृती यांसारख्या माध्यमातून त्यांनी अनेक ठिकाणी शेतकरी व कामगारांचे प्रश्न प्रभावीपणे मांडले. तसेच, “पेरू वाटप आंदोलन” व “भव्य जनसंवाद मेळावे” यांच्या माध्यमातून शासन दरबारी विविध मागण्या मांडण्यात आल्या.
या अतुलनीय सामाजिक योगदानाची दखल घेत त्यांना एका खाजगी वृत्तवाहिनीच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने राज्यस्तरीय पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.
